शरद पवारांनी आमचा गेम केला. शपथविधी होण्यापूर्वी पवारांशी चर्चा झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांच्या विधानात यामध्ये तथ्य आहे, असे मुनगंटीवारांनी म्हंटले आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, फडणवीसांच्या विधानात तथ्य आहे. राजकीय सेटिंगची शक्ती त्यांच्यात आहे. वसंतदादा पाटील यांच्या सरकार वेळी त्यांनी आमदार फोडले. काँग्रेसमधून ते बाहेर पडले व पुन्हा गेले. त्यावर फडणवीस जे बोलत आहेत, त्यावर विश्वास ठेवायला जागा आहे.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, मागच्या काही महिन्यांपासून आपल्याकडे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या गोष्टी सुरु आहेत. 2019 मध्ये शरद पवार यांनी मंत्रिपदं, पालकमंत्रिपदं देखील फायनल केली होती. अचानकपणे त्यांनी माघार घेतली आणि आपण कॉंग्रेसबरोबर जाणार असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, असंही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आम्हाला सोडून जातील असं वाटलं नव्हतं. भाजप-शिवसेना आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठं मन केलं त्यांना जागा दिल्या. पण तेव्हाही बेइमानी झाली. आम्ही आमच्या पक्षातून शिवसैनिक दिला.उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला अनेकवेळा सहानुभूती राहिली आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते,तेव्हा मी त्यांना अनेक वेळा सांगितले की, तुमची वाट चुकत आहे. पण त्यांनी ऐकलं नाही असंही यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
