राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरनंतरच – सहकारमंत्री अतुल सावे

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण जाते. तसंच, शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती. या सर्व कारणांमुळे सावे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात ८२,६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत.

राज्यात निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या ८२ हजार ६३१ (२५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून) असून, त्यातील ४९ हजार ३३३ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशा संस्थांपैकी ४२ हजार १५७ संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून, सहा हजार ५१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर 2023 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.