2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. भल्या पहाटे हा शपथविधी घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या शपथविधीबाबत अनेकांच्या मनात अद्याप मोठा संभ्रम आहे. तर अनेक मुलाखती, चर्चासत्रे यावेळी अनेक वेळा हा विषय समोर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी नेमकं काय घडलं? याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची ‘हिस्टरी’ समजून घ्यायला हवी. तरच ही ‘मिस्ट्री’ कळेल. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात.”
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे गौप्यस्फोट केला. त्यावेळी सरकार स्थापनेला शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा होता. मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती. तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपावण्यात आल्या होत्या असं फडणवीस यांनी सांगितलं.
“आमचा शपथविधी व्हायच्या 3-4 दिवस आधी शरद पवारांनी यामधून माघार घेतली. आम्ही (अजित पवार आणि मी) पूर्ण तयारी केली होती त्यामुळे अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय इतर पर्याय उरला नाही. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. आपण इतक्या बैठका घेतल्या असल्याने बाकीच्या (राष्ट्रवादीच्या) आमदारांसहीत शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण तसं घडलं नाही आणि शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळेच आमचं सरकार पडलं. मात्र मी हे ठामपणे सांगेन की, त्यावेळी जो सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता त्याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती,” असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
