शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून विकास कामांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्राच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.वर्षभरात राज्य मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये 20 पेक्षा अधिक निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय झाले आहे. राज्यात खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्यात पशु, दुग्ध आणि मत्स्य व्यवसायात अधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन, खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मध्ये सुधारणा करण्यात येईल व अध्यादेश काढण्यात येईल. राज्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. मात्र पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य प्राप्त पुरेसे मनुष्यबळ नाही.

त्यामुळे कायमस्वरुपी विनाअनुदानित खासगी महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी अनेक लोकप्रतिनीधींकडून करण्यात येत होती. सध्या नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांच्या अंतर्गंत 10 महाविद्यालयांमधून 557 पदवी आणि 216 पदव्युत्तर इतकी प्रवेश क्षमता आहे. या महाविद्यालयांचा आर्थिक भार राज्य शासनावर आहे.