एकीकडं 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे करत आहेत. तर त्याचदिवशी त्यांना शिवसेनेकडून जोर का झटका दिला जाणार आहे. आदित्य ठाकरेंचे खास मित्र आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य 1 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचा मोठा कार्यक्रम असताना ठाकरेंना धक्का देण्याची परंपरा मुख्यमंत्र्यांनी सुरूच ठेवली आहे.आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
1 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. युवासेनेतील अंतर्गत राजकारणामुळे राहुल कनाल नाराज असल्याची माहिती मिळत आहे.राहुल कनाल यांच्या पक्षप्रवेशावर श्रीकांत शिंदे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने विचारलं. त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचा जनाधार आणि विश्वास वाढत आहे. रोज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर लोक जोडली जात आहेत. आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुरु आहेत.”
मविआची सत्ता असताना शिर्डी संस्थानवर कनाल यांची विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. युवा सेनेतल्या अमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवा सेना सोडली होती. राहुल कनाल हे वांद्रे पश्चिममधून विधानसभेसाठी तयारी करत होते.
ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी 18 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधानपरिषद सदस्य व शिवसेना पक्षप्रवक्ता मनीषा कायंदे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय कशासाठी घेतला, याबाबत त्यांनी मोठा खुलासा केला.
