मुंबई महापालिका अधिकारी मारहाण प्रकरणात,अनिल परबांसह सहा जणांना अंतरिम दिलासा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केला होते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यातील चार जणांना पोलिसांनी अटकही केली आहे.

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी अटक टाळण्यासाठी अनिल परब यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता अनिल परबांना मुंबई सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. चार जुलैपर्यंत अटक अथवा कारवाई न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

वांद्रे येथील ठाकरे गटाचे शाखा मुंबई महापालिकेने अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत पाडले होते.त्या निषेधार्थ ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी अभियंत्याला मारहाण केली होती.याप्रकरणी अटक टाळण्यासाठी अनिल परब यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.परब यांच्यासह सहा जणांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने चार जुलैपर्यंत अटक अथवा कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परबांना काहीसा मोठा मिळाला आहे.

ठाकरे गटाची मुंबईच्या वांद्रे परीसरातील शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत त्या शाखेच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाई वेळी शाखेत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते, ते फोटो काढू न दिल्याचा दावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट पालिकेत जाऊन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पोलिसांसमोरच मारहाण केली होती.