राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आधी जूनमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा दिल्लीवाऱ्या झाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवरच पडला. आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे जाहीर केलं आहे.

वर्षभरात अनेकवेळा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा दिल्लीच्या वाऱ्या केल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, अशी नेहमीच प्रतिक्रिया देण्यात येत होती. परंतु कालच्या दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याचे सूचक विधान केले आहे.

राज्याचे अनेक प्रश्न असतात या संदर्भात पाठपुरावा घ्यावा लागतो. अनेक वेळा त्या संदर्भातला बैठकादेखील असतात त्यासाठी हा दिल्ली दौरा होता. त्यानंतर त्यांनी रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य केले. ते म्हणाले की, एवढं स्पेसिफिक सांगत नाही पण मी सांगतोय, मंत्रिमंडळ विस्तार आता जुलै महिन्यात करू असे त्यांनी सांगितले. आम्हाला विस्तार करायचा असून, मुख्यमंत्री त्यावर योग्यवेळी निर्णय घेतील असेही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केले. ते संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी केंद्राचा विस्तार आधी होणार की राज्यातील विस्तार आधी होणार असे विचारले असता ते म्हणाले की, केंद्राचा आणि राज्याच्या विस्ताराचा काहीही संबंध नाही. केंद्राचा विस्तार कधी होणार याबाबत काही माहिती नाही. तसेच आम्हाला राज्याच्या विस्तारात अधिक स्वारस्य आहे.“ज्याला बातमी मिळाली नाही तो या मंत्र्यांना काढणार, त्या मंत्र्यांना घेणार अशी एक बातमी तयार करतो आणि सोडतो. अशा बातमीला कोणतीही विश्वासार्हता नाही. जुलै महिन्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल. इतर कुणी इतकं स्पष्टपणे बोलत नाही,” असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.