समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टर बचावले आहेत. ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेखला किरकोळ दुखापत झाली आहे. सेकंड ड्रायव्हर अरविंद मारुती जाधव अपघातावेळी झोपला होता. दुसऱ्या ड्रायव्हरलाही किरकोळ दुखापत झालेली आहे.
या अपघाताच्या वेळी बसमध्ये 30 प्रवाशी होते. पाच जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघातात बसचे चालक आणि वाहक हे बचावले आहेत. या दोघांना सध्या पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.अपघातग्रस्त बसचा ड्रायव्हर दानिश शेख याने असं सांगितलं आहे, की बसचा टायर फुटल्यानं अपघात झाला आहे. मात्र, त्याचा हा दावा कितपत खरा आहे, हे तपासानंतरच समोर येईल. अपघातग्रस्त गाडीचे सर्व टायर जळून खाक झाले आहेत. टायर फुटल्याचा काहीही पुरावा किंवा निशाणी घटनास्थळी मिळालेली नाही. त्यामुळे खरंच बसचा टायर फुटला की ड्रायव्हरला डुलकी लागली होती ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बसचालक दानिश शेख इस्माईल शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मात्र याबाबत अमरावती आरटीओचा अहवाल समोर आला असून त्यामध्ये टायर फुटल्याने अपघात झाला नाही, असे प्रथमदर्शी दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचेही या अहवालात म्हणले आहे.
बसमधील बचावलेल्या प्रवाशांनी बोलताना या अपघाताची माहिती दिली आहे. “आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो होतो. त्यानंतर दिड ते दोन तासानं बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने लगेच पेट घेतला. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. पण आग एवढी भयंकर लागली होती की, काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली.
