‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत टोमॅटो आणि इतर भाजीपाला उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी नारायणगाव येथे फूडपार्क उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. त्याबाबत आणि शिवनेरी आंब्याला फळपीक विमा योजना लागू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या श्री. शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कृषिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषि संचालक कैलास मोते, विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नाईकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, कृषि विकास अधिकारी अशोक पवार आदी उपस्थित होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी संपन्न व्हावा यासाठी शासन प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासोबत नैसर्गिक शेतीवरही भर देण्यात येत आहे. राज्यात श्री अन्न अभियान सुरू करण्यात आले असून त्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा आणि जोडव्यवसाय उपलब्ध करून देण्यावर भर आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत राज्यातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याने केंद्र आणि राज्याचे मिळून आता शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे.
शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत २ लाखापर्यंत मदत देण्यात येणार आहे. कृषि यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया उद्योगावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि आयुक्तालयाने नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी विशेष कार्यक्रम आखावा, अशी सूचना त्यांनी केली.
