बुलढाणा अपघाताची चौकशी होणार, अपघातानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातावर देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. बस दुभाजकाला धडकल्यामुळं डिझेलची टाकी फुटून बसला आग लागली. त्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामधून आठ जण सुखरुप बाहेर आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवून देण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींचा रुगणालयाचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. ह्या अपघातात मानवी चूक देखील असू शकते किंवा टायर फुटल्याने देखील अपघात होऊ शकतो, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आता घटनास्थळी जाणार आहोत. तिथे जाऊन आम्ही घटनेची सविस्तर माहिती घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. हा अपघात होण्याची नेमकी कारणं काय आहेत, याबाबतची माहिती घेत असल्याचे फडणवीस म्हणाले.