समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असतानाना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या समृद्धी महामार्गाला त्यांनी शापित महामार्ग असे म्हटले आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा होरफळून मृत्यू झाला. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना समृद्धी महामार्गाला अनेकांचे शाप लागले आहेत. त्यामुळे तो शापित महामार्ग आहे, असे राऊत म्हणाले.
वास्तविक त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला होता. 27 जानेवारी 2021 रोजी ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे 347 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. अमरावती जिल्ह्यातील शिवनी-रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी प्रत्यक्ष रस्त्यावरुन प्रवास करुन सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो मार्ग विकासाचे ग्रोथ इंजिन असे म्हटले जात होते त्यालाच आता विरोधासाठी विरोध करायचा म्हणून राऊत शापित महामार्ग म्हटल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
