अजित पवारांच्या बंडामुळे राज्यासह राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधी पक्षांची बैठक रद्द

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला आहे. शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री झाले आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह माझ्याकडेच आहे. पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो. शपथविधीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा केला आहे. या राजकीय भूकंपाचा हादरा महाविकास आघाडीला बसला आहे. अजित पवार यांचा मोठा गट फुटल्याने महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला तडे गेले आहेत.

अजित पवारांच्या या बंडामुळं फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे बंगळुरुत होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या हेतूने ही बैठक होणार होती. जेडीयूचे वरिष्ठ नेते के सी त्यागी यांनी बैठक रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बैठक सध्या रद्द केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच लवकर नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले आहेत. पावसाळी अधिवेशानानंतर ही बैठक होईल असं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक रद्द झाल्याचं बोललं जात आहे.

आता विरोधी पक्षनेत्यावरून रस्सीखेच, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचाही दावा

अजित पवार यांनी आपण शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता, असं सांगितलं आहे. अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे, याशिवाय त्यांना पक्षाचा विधानसभेतला प्रतोद म्हणूनही जाहीर केलं आहे.एकीकडे राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केलेली असतानाच दुसरीकडे काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेस पक्ष 4 जुलैला विरोधी पक्षनेता ठरवणार आहे. आमदारांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. यानंतर 5 जुलैला काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर काँग्रेस विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर करणार आहे.

“काही जागा राष्ट्रवादीकडे गेल्या, काही जागा ठाकरेंकडे गेल्या होत्या. पण आता पूर्वीप्रमाणेच राज्यात दोन प्रमुख पक्ष उरले आहेत. पवार साहेब काय करतात माहित नाही. किती लोक गेलेत माहीत नाहीत. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना बोलण्याएवढा मी मोठा माणूस नाही. जेवढे आमदार शिल्लक राहिलेत याबाबत काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. पण, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, ठाकरेंसोबत बोलणं झालं आहे. आपण दोघं एकत्र मिळून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये कायम ठेवू. एकत्र येऊन महाराष्ट्रातील आगामी काळातील निवडणुका लढवू, असं ठरलं आहे”, अशी माहितीही अशोक चव्हाणांनी दिली.