अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे शरद पवारांनी पुन्हा पक्ष उभारणीसाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. तर महाविकास आघाडीकडून एकनाथ शिदे अपात्र ठरणार असल्यामुळेच अजित पवारांच्या शपथविधीचा घाट घातला गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या एका विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
उद्धव ठाकरेंनी ठोस भूमिका घ्यावी. शिवसेनेने एकला चलो ची भूमिका घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेची तशी इच्छा आहे. “प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंच्या दोन वेळा बैठका झाल्या. पण वंचितला मविआमध्ये घेण्यासाठी सर्वात मोठा विरोध अजित पवारांचा होता. ‘प्रकाश आंबेडकर बेभरवशाचे आहेत. ते आयत्यावेळी तुम्हाला फसवतील’, असं अजित पवार वारंवार सांगायचे. आता प्रकाश आंबेडकर आहे तिथेच आहेत, पण अजित पवारांनी उडी मारली”, असा टोला राऊतांनी लगावला.
आम्ही वरिष्ठांना सांगून निर्णय घेतला असे अजित पवार म्हणत आहेत. याचा अर्थ त्यांचा वरिष्ठ कोण? असा सवाल करतानाच अजित पवार बंड करतील याची कल्पना होती. पण आता या क्षणापासून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र होणार म्हणून भाजपचा अजित पवार यांना सोबत घेऊन दुसरा प्लॅन तयार झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.
