अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मिटिंगमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर आपण या सरकारमध्ये विकासाच्या मुद्द्यासाठीच आलो आहे असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. नरेंद्र मोदी हे देशाचा विकास करत आहेत तसेच देशपातळीवर नरेंद्र मोदींशिवाय आज देशाला पर्याय नाही. देश त्यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करत आहे.२०२४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना पर्याय नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत. तसंच राष्ट्रवादी सरकारमध्ये आल्याने कुणीही नाराज नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली, या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळाची पहिली बैठक ९ मंत्र्यांची होती आम्हाला अडीच वर्षाचा अनुभव आहे. मध्ये एक वर्षाचा गॅप पडला. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आम्ही मार्गी लावले.
खातेवाटपासंदर्भात प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पद द्यायचे असतात किंवा पालकमंत्री अशा बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे मतमतांतर असू शकतं. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु यासंदर्भात मुख्यमंत्री या नात्याने अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी जाणार आहेत. त्यानंतर त्याठिकाणी देखील या दोघांमध्ये याबाबतची चर्चा करण्यात येणार आहे. तर गरज पडली तर ते माझ्याशी संपर्क साधतील, अशी माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
