अमरावती-पुणे ज्यादा रेल्वे गाड्यांचे रेल्वे विभागाने नियोजन करावे. तसेच हावडा-पुणे दुरंतोला बडनेरा स्थानकासह वर्धा येथे थांबा देण्याच्या सूचना करत विदर्भातील विविध रेल्वे स्थानकांच्या विकासासंदर्भात खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज रेल्वे सांसद समितीच्या नागपुर येथे झालेल्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली.
मध्य रेल्वेच्या नागपूर व भुसावळ विभागाची रेल्वे सांसद समीती सदस्य बैठक आज नागपूर येथील महाप्रबंधक कार्यालयात खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवानी, खासदार ज्ञानेश्वर पाटील, हेमंत गोडसे, सुभाष भामरे, दुर्गादास उईके यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान बोलताना खासदार डॉ.अनिल बोंडे म्हणाले, पुणे, ठाणे, दादर, कल्याण आदी ठिकाणी विदर्भातील नागरिक प्रवास करतात. अमरावतीच्या प्रवाशांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. शैक्षणिक, आर्थिक, पर्यावरणी, आद्योगिक दृष्टिकोनांसह विविध कामांसाठी पुणे सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे अमरावती-पुणे या मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करावे. तसेच हावडा-पुणे दुरंतोला वर्धा व बडनेरा स्थानकावर थांबा देण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी महाप्रबंधक नरेश लालवानी यांना केल्या. या बैठकीदरम्यान एक स्टेशन एक उत्पादन, रेल्वे रेस्टॉरंट, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, स्टेशन अपग्रिटेशन, स्टेशन पादचारी पुल, स्टेशन परिसरांचे सौंदर्यकरण, स्टेशन पुनर्विकास योजना, प्रसाधनगृहे, रेल्वे स्थानक पुनर्निर्माण आदींसह रेल्वे विभागाच्या विविध सोयी सुविधांचा आढावा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी घेतला. विदर्भातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा
वरुड तालुक्यातील बोरगाव स्थित रेल्वे पुलाच्या खालून टाकण्यात आलेली पाईपलाईन रेल्वे विभागाने काढून टाकली. त्यामुळे ती पूर्वरत करावी. दिलीप खुटपडे (जरूड )यांची रेल्वे लाईन अंथरण्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. मात्र त्यांना अद्यापही मोबदला देण्यात आला नाही. अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्याची तपासणी करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. रेल्वेने वरुड ते रोशनखेड पर्यंत जुना रस्ता अधिग्रहीत केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा पिकाचे नुकसान होत आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देखील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केल्या. नवीन रेल्वे लाईन अंथरताना शेतकऱ्यांकडून अधिकची जमीन घेण्यात आली आहे. अशा प्रकरणांची तपासणी करून नियमानुसार असलेली जमीनच शेतकऱ्यांकडून घ्यावी. अतिरिक्त शेतकऱ्यांची जागा त्यांना परत करावी. वरुड, रोशनखेड, सावंगी गणेशपुर भागात अंडर ब्रिज आहे. त्या ठिकाणी खड्डे केल्यामुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सोयी सुविधा खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांना शेती करताना अडचणी येत आहेत. त्या तातडीने दूर कराव्या. नवीन रेल्वे लाईन अंथरताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.
शेगाव स्थानकाचे संत गजानन महाराज रेल्वे स्थानक नाव व्हावे
संत नगरी शेगाव येथे देशभरातून लाखो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे अमृत काळात येथील रेल्वे स्थानकाचे पुनर्निर्मान व्हावे. जास्तीत जास्त गाड्यांना त्या ठिकाणी थांबा द्यावा. येथील संपूर्ण रेल्वे स्थानकाचा कायापालट करावा. प्रशस्त पार्किंगची सुविधा त्या ठिकाणी असायला हवी. तसेच, शेगाव रेल्वे स्थानकांचे नाव ‘संत गजानन महाराज रेल्वे स्थानक’ असे करण्याच्या सूचना देखील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केल्या.
