शरद पवार यांना विठ्ठल संबोधन तात्काळ थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू – तुषार भोसले

शरद पवार यांना विठ्ठल बोलणं तातडीने थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी आमदार रोहित पवार यांना दिला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ओढ विठ्ठलाच्या भेटीची असं म्हणत रोहित पवार यांनी शरद पवार यांचा फोटो ट्विट केला होता. या ट्वीटवरून तुषार भोसले यांनी हा इशारा दिला आहे.

जगाचा मालक आणि महाराष्ट्रचं आराध्य दैवत असलेल्या निर्विकार विठ्ठालाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभता का? असा सवाल तुषार भोसले यांनी केला आहे. पुढे ते असं देखील म्हणाले की, शरद पवारांना विठ्ठल म्हटल्याने आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? किमान थोडी तरी लाज बाळगा. शरद पवारांना विठ्ठल संबोधनं तात्काळ थांबवा. अन्यथा तुमच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागतील. असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.

अजित पवार गटाच्या मुंबईत झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार गटाचे नेते छगन भुजभळ यांनी यांसंबंधी विधान केलं होतं. साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या अशी विनंती भुजबळांनी या सभेत बोलताना शरद पवारांना केली होती. यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त ट्विट केलं. “ओढ ‘विठ्ठला’च्या भेटीची!!! कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरीक यांची आज नाशिकला भेट झाली असता आम्ही सर्वजण आमच्या विठ्ठलाच्या अर्थात मा. पवार साहेबांच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं…” असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.