यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे.1 ऑगस्टला हा पुरस्कार सोहळा होणार असून या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. दर वर्षी 1 ऑगस्टला पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार पीएम मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. यंदा या पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे. तसेच या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.
2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनवेळा पुण्यात आले होते. त्यावेळी पुण्यात जय्यत तयारी करण्यात आली होती. पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी मोदी आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते पालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी मोदी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वारकरी सांप्रदायाचं कौतुक केलं होतं. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच असल्याचं सांगितलं होतं. आता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहे. 2024 च्या निवडणुकादेखील आहेत. त्यासंदर्भात काही बोलतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
