महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांची नागपुरात सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. या ऑडिओ क्लिपमध्ये ते भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीच सत्ता स्थापन करणार नाही. एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं फडणवीस या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाले आहेत. ही ऑडिओ क्लिप काही वर्षांआधीची आहे. पण ती सध्या व्हायरल होतेय. ही क्लिप उद्धव ठाकरे यांनी ऐकवून दाखवत “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा”, अशा खोचक शब्दांत टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ८ मुद्द्यांच्या माध्यमांतून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. तसेच, “स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!,” असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजयुमोर्च्या वतीने निषेध करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी विमानतळावरील ठाकरेंच्या स्वागतासाठीचे होर्डिंग्ज फाडले, तर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
‘कलंकीचा काविळ’ !
१. ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
२. आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
३. सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
४. सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
५. ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
६. पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
७. कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
८. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द कशी सुरु झाली ते मी सांगतो, त्यांनी स्वत:च्याच मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करुन यांनी पुलोद काढली. का? तर मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बाकी गेलं खड्ड्यात. त्यानंतर त्यांनी राजीव गांधींसोबत द्रोह केला, अशी टीका उद्धव ठाकरे या व्हिडिओत करत आहेत.
पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक. सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक”, अशी टीका फडणवीस यांनी केली.
