जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवावी – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या.

पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गावपातळीपर्यंत केलेल्या आरोग्य सेवा तयारीचा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुणे येथे राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची उपस्थिती होती.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हास्तरावरील अहवाल दररोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत ज्यामुळे पिण्यायोग्य पाणी आहे किंवा नाही याची खात्री केली जावी, जिल्ह्यातील नोडल अधिकारी त्यांचे दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अद्ययावत अहवाल तयार ठेवावा, आशासेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्याही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात. तसेच डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणी साठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे. शीघ्रप्रतिसाद पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच सूचनासाठी एक माहिती पुस्तक तयार करण्यात यावे व मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, औषध साठा अद्ययावत करून उपलब्ध ठेवण्यात यावा, साथरोगाबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे फलकही लावण्यात यावेत, असे निर्देशही यावेळी मंत्री सावंत यांनी दिले.

अतिरिक्त मुख्य सचिव म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे सूचित केले. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.