अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण तब्बल 53 वर्षांनंतर पूर्णत्वास गेले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाव्या कालव्याचे उदघाटन करण्यात आले. तसेच मोदी यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. या धरणाच्या माध्यमातून जवळपास अहमदनगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील 182 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.त्यापूर्वी पंतप्रधानांनी शिर्डीत साई बाबा मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. पाच वर्षांनी पंतप्रधान मोदी साई बाबांच्या दर्शनाला आले. पंतप्रधानांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली. तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
साईबाबांच्या दर्शनासाठी असलेले हे कॉम्प्लेक्स वातानुकूलित असून अत्याधुनिक सुविधा तेथे आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी तेथे एक उत्तम प्रतिक्षालयही आहे. विशेष म्हणजे दर्शन रांगेच्या या कॉम्प्लेक्सची पायाभरणी ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 2018 साली झाली होती. आणि आज त्याच संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधनांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पीएम मोदी यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून धरणाची पाहणी करत धरणाबाबत माहिती घेतली. याचबरोबर डाव्या कालव्यातून पाणी देखील सोडण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 मे रोजी कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाव्या कालव्याचे लोकार्पण करण्यात आले.
