मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; आमदार नितेश राणेंचा आरोप

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता याचे प्रकरण शुक्रवारी उघड झाले. सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने पार्टी केल्याचा आरोप झाला. सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यासंदर्भातील फोटो दाखवत गंभीर आरोप केले. सुधाकर बडगुजर याला कोणाचा वरदहस्त आहे, त्याला हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून कसे संरक्षण दिले जात आहे, शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही समोर आणावे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली.

नितेश राणे म्हणाले, दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी 93 च्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेप भोगतोय. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षासोबत पार्टी करतो. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो आणि व्हिडीओ आहेत.1993 चा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील यारोपी सलिम कुत्ता हा पेरोलवर असताना तो पार्टी करतो. ⁠उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो, ⁠हे गंभीर आहे. याला कोणाचा पाठींबा आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला. १९९३ मधील बाँबस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणाऱ्यांना कोण वाचवत आहे. शिवसेना भवन उडवण्याचा कट असलेला आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. या घटनांमुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढतो. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे शेलार यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांकडून एसआयटीची घोषणा

यावर उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. फडणीस सभागृहात बोलताना म्हणाले की, हा विषय अतिशय गंभीर आहे. बॉम्ब स्फोटात जे आरोपी आहेत, तसेच देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता यासोबत पार्टी करणं, खरंतर हा पॅरोलवर बाहेर होता. त्यामुळे त्याला पार्टी देखील करता येत नाही. त्यामुळे त्याने पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हा गंभीर प्रकार आहे.

सलीम कुत्ता पेरोलवर असताना पार्टी कसा करु शकतो. या कुत्ताशी त्या व्यक्तीचा संबंध काय, त्यात कोण कोण सहभागी आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याची चौकशी होईल. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. त्यासाठी एसआयटीला विशिष्ट काळाची मुदत दिली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.