केरळमध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; वेगानं पसरणारा नवा व्हेरियंटही आढळला

जगभरात कोरोना व्हायरसच्या नवीन सबव्हेरिएंटचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच दरम्यान, भारतात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भारतात कोरोनाचे 335 नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्ण आढळल्यानंतर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,701 वर पोहोचली आहे. याशिवाय रविवारी पाच कोरोना बाधित लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी चार मृत्यू फक्त केरळमध्ये झाले, जिथे कोरोनाचा नवीन सबव्हेरिएंट JN.1 आढळला.

कोविडचा नवा व्हेरिएंट समोर येताच केरळ सरकार अलर्ट मोडवर आहे. आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक घेतली. मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. केरळची सीमा बंद न करण्याच निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले की, आम्हाला मॉक ड्रिल करावं लागेल आणि कशासाठीही तयार राहावं लागेल. पुनरावृत्ती होत असल्यास, आपण तयार असणं आवश्यक आहे. आम्ही मास्क, ऑक्सिजन सिलेंडर इत्यादींची तयारी केली आहे.

दरम्यान, कोविडचा धोका पुन्हा वाढल्याने नागरीकांना खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क घालावा तसेच श्वसनासदंर्भात त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.केरळमधील घटनेनंतर कोव्हीड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांना ताप आहे त्यांना आयसोलेशनमध्ये राहण्याची सूचना दिली गेली आहे. तसेच जे कोव्हीड पॉझिटिव्ह आहेत, त्यांना क्वारंटाईन करण्याचे म्हटले आहे. मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले आहेत.