स्वातंत्र्य काळात जहाल पक्षाचे नेते असलेले लोकमान्य टिळक यांनी नेहमीच देशहित सर्वोतोपरी मानले. शरीर, मन आणि बुद्धी त्यांनी देशसेवेकरिताच खर्च केली. यामुळे ते देशाचे अमर आदर्श आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगलीत केले.सांगली येथील चिंतामणराव पटवर्धन व्यापार महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये डॉ. भागवत बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ, संस्थेच्या अध्यक्षा मनिषा काळे, माधव बापट, प्रकाश बिरजे, माणिक जाधव, अमृता गोरे, विनायक काळे आदी. उपस्थित होते.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ‘समाजाला दिशा देण्याची नेहमीच आवश्यकता असते. सभोवतालची परिस्थिती बदलली तरी आपल्या ध्येयाची दिशा कायम राहिली पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी सशस्त्र क्रांतीचा प्रवाह समाजमनात होता. परंतु स्वातंत्र्यानंतर समाज सुधारणेकरिता आंदोलने सुरु झाली. आपण ज्यावेळी स्वराज्य हा शब्द उच्चारतो त्यामध्ये असणारा ’स्व’ हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कित्येकांना ’स्व’ ची ओळख नसते. प्रत्येकातील ’स्व’ जागृत करण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले. लोकमान्य टिळक यांनी आत्मियतेचे सूत्र जोपासले होते. त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यास आपल्याला याचा प्रत्यय येतो. लोकमान्यांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक राहतील. लोकमान्यांचे विचार चिरंतन राहण्यासाठी उपक्रम करीत असताना त्यामध्ये सातत्य हवे, केवळ सवय म्हणून नको तर प्रेरणादायी विचार मिळायला हवेत असेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यकाळात जहाल पक्षाचे नेते असलेले लोकमान्य टिळक यांनी नेहमीच देशहित सर्वतोपरी मानले. त्यांनी शरीर, मन आणि बुद्धी देशसेवेकरताच खर्च केली. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या माध्यमातून मागील ९९ वर्षांपासून जे उपक्रम चालू आहेत, ते टिळक विचारांचा जागर करणारे असून यापुढील काळातही ते निरंतर चालू राहिले पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आचरणात प्रथम देशहिताच विचार अग्रक्रमाने केला पाहिजे.
