पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन (एमडी-मेफेड्रॉन) मिळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेने छापा टाकून ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकमध्ये या पावडरची विक्री केली जात होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय 35 वर्ष, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
अमली पदार्थांच्या रॅकेटची पाळेमुळे खोदून तस्करांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिला. पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे आणि सतीश गोवेकर या वेळी उपस्थित होते. अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केल्याबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हे शाखेच्या युनिट एकला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पुणे शहरात ड्रग्स विक्री करण्यासाठी आरोपींनी शक्कल लढवली. ड्रग्ससाठा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून हैदर शेख याने मिठाच्या पाकिटात विश्रांतवाडी परिसरात ड्रग्स लपावले होते. या ड्रग्सची मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे विक्री केली जाणार होती. हे दोन्ही परदेशी नागरिक आहेत. पुण्यात पकडलेले एमडी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार होते. माने आणि हैदर यांच्यावर यापूर्वी अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, पुण्यातील ड्रग्स विक्रीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे. पुण्यात सापडलेल्या या ड्रग्सची विक्री देशातील विविध भागात तसचं परदेशात होणार होती. इतकंच नव्हे, तर पुण्यात पकडलेले एम.डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे त्यांची विक्री करण्यात येणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या माने आणि हैदर यांच्याविरोधात आधीपासूनच अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. किंबहुना माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले होते. कारावासानंतरही त्यांनी ड्रग्स विक्री सुरुच ठेवली होती.
पुण्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक केल्यावर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे. या कारवाईत मोठी आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात पुण्यात मिळणाऱ्या ड्रग्समुळे पुण्यातील तरुणाई चालली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या परिसरात सव्वादोन कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले होते.
