राज्यभरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. या वर्षी उन्हाळा हा तीव्र राहणार आहे. राज्यात काही जिल्ह्याचे तापमान हे मोठ्या प्रमानात वाढले आहे. राज्यात सध्या कोरडे हवामान राहणार असून तापमानात देखील वाढ होणार आहे. या सोबतच पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. विदर्भात १६ आणि १७ तारखेला तुरळक ठिकाणी हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मालेगावमध्ये राज्यातील सर्वाधिक ४० अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मालेगाव येथे राज्यातील सर्वाधिक ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल, सोलापुरात ३९.८, सांगलीत ३८.६, सातारा, कोल्हापुरात ३७.७, पुण्यात ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात चंद्रपूरमध्ये ३९.४, वाशिममध्ये ३९.२, ब्रह्मपुरीत ३८.८, नागपूर येथे ३८.५, वर्ध्यात ३९.२, परभणीत ३८.४, उदगीरमध्ये ३७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किनारपट्टीवर रत्नागिरीत ३३.६ आणि अलिबागमध्ये ३१.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
उत्तर छत्तीसगडपासून विदर्भ, तेलंगणा ते उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व विदर्भासह महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील तालुक्यांत ढगाळ हवामान होत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने झळा आणि उकाडा तापदायक ठरत घामटा निघत आहे. पुढील काळात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात येथे ४८ तासात मुख्यतः हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. १४ व १५ तारखेला आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे राहील. या काळात किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही.
राज्यातील कमाल तापमानाचा आकडा वाढत असतानाच किमान तापमानातही वाढ नोंदवली जात आहे. मुंबईत किमान तापमान २२ अंशांच्या घरात पोहोचल्यामुळं शहरातील उकाड्याच्या तीव्रतेचा एकंदर अंदाज लावता येत आहे. दरम्यान, पुढील दिवसांमध्ये उष्णतेचा हा दाह कमी होण्याची चिन्हं नसून त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं आरोग्य विभागाकडून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही देण्यात येत आहे.
