मुंबईच्या धरणांत केवळ ३२ टक्के पाणी; फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या ७ धरणांमध्ये फक्त दोन महिने पूरेल एवढंच पाणीसाठी उपलब्ध आहे. या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावला असून तो३२.३२ टक्क्यांपर्यंत खाली उतरलाय. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी नीचांक असून मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट ओढवू शकतं. धरण परिसरात पाऊस होण्यापर्यंत म्हणजे पुढील चार महिने मुंबईकरांना पाणी साठा पुरवण्याच खडतर आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे.

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून ४ लाख ६७ हजार ७६६ दशलक्ष लिटर (३२.३२ टक्के) पाणीसाठा आहे. मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यानुसार आता उपलब्ध असलेले पाणी पुढील दोन महिने पुरेल. पालिकेच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी तीन दिवस पुरते. म्हणजेच महिन्याला सुमारे १२ ते १३ टक्के पाण्याचा वापर होतो. मात्र उन्हाच्या झळा बसू लागल्या असून पाण्याचे बाष्पीभवन मोठया प्रमाणात होते. जूनमध्ये पुरेसा पाऊस होत नसल्याने हे पाणी जुलैपर्यंत पुरवावे लागते. गेल्यावर्षी २५ मार्चला ३८ टक्के तर २०२२मध्ये ४१ टक्के पाणीसाठा होता.

मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी मुंबई पालिकेने राज्य सरकारला राखील साठ्यातून पाणी मिळवण्यासाठी पत्र लिहिलं होतं.मार्च महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये फक्त ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळवण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे.

भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीच्या कामामुळे २४ एप्रिलपर्यंत पाच टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यातच पावसाने ओढ दिली होती व ऑक्टोबर महिना कोरडा गेला होता. दरवर्षी ऑक्टोबपर्यंत पाऊस पडत असल्याने धरणे काठोकाठ असतात.