मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रकारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण 40 नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे.
युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट आता आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सोपविणे बाकी राहिली आहे. शिवसेनेचे सेक्रेटरी संजय मोरे यांनी ही यादी आयोगाला सादर केली. त्यात पहिल्या नंबरवर नरेंद्र मोदी, तर त्यानंतर अमित शाह, जे.पी.नड्डा, नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी भाजपचेच दिग्गज नेते आहेत.
राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत का नाही? याची चर्चा आता रंगली आहे. शिवसेनेच्या लोकसभेतले प्रमुख नेते म्हणजे राहुल शेवाळे. मात्र स्टार प्रचारकांच्या या यादीत त्यांचं नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहे आणि अनेकांच्या यादीमुळे भुवया उंचावल्या आहेत. अशात राहुल शेवाळे यांच्या नावाची वेगळी घोषणा स्टार प्रचारक म्हणून केली जाऊ शकते. मात्र सध्या तरी या यादीत त्यांचं नाव नसल्यानेच विविध चर्चा रंगल्या आहेत.
लोकसभेला इच्छुक असून तिकीट कापले जाण्याची शक्यता असलेले आनंदराव अडसूळ, कृपाल तुमाने यांना स्टार प्रचारक करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले आमदार भरत गोगावले, प्रवक्ते संजय शिरसाट हे ही या यादीमध्ये आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यातील शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, दीपक केसरकर, अब्दूल सत्तार, तानाजी सावंत, दादाजी भूसे, संदीपान भूमरे, संजय राठोड, दिपक सावंत आदींचाही समावेश या यादीत आहे.
