मरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी रात्री उशीरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत.
अमरावती लोकसभा मतदार संघात भाजप चे तिकिट मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. पहिले पक्षप्रवेश मग तिकिट असा प्रकार मात्र नवनीत राणा यांच्या बाबत झाला. पहिले लोकसभेचे तिकिट मग घेतला भाजप प्रवेश असे का झाले असा प्रश्न पत्रकारांनी राणा यांना विचारला. त्यावर नवनीत राणा यांनी असे काही उलट झाले नाही, सगळे सरळ झाले असे उत्तर पत्रकारांना दिले.
भारतीय जनता पक्षात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. विरोधी पक्षात असताना ३३ महिने लढा दिला, आमची विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळे होऊ शकत नाही. भाजपाच्या ४०० पार च्या संकल्पात अमरावतीची खासदार म्हणून मी एक असेल, असेही त्या म्हणाल्या.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला आहे. त्यांचा पक्ष प्रवेश भाजपा संघटनेला मजबुती प्रदान करणारा असेल. नवनीत राणा या अमरावती नव्हे तर विदर्भ व महाराष्ट्राच्या नेत्या असतील.
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीपासून नवनीत राणा या एनडीएचा भाग राहिलेल्या आहेत. त्यांनी संसदेत वेगवेगळी महत्त्वाची विधेयकं मजूर होताना भाजपच्या समर्थनार्थ मत दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी राणा यांचे प्रयत्न चालू होते. त्यासाठी राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची अनेकवेळा भेट घेतली होती. राणा दाम्पत्य तसेच फडणवीस यांची या विषयावर अनेक बैठका झाल्या. त्यानंतर आता शेवटी राणा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. राणा आता अमरावतीतून महायुतीच्या अधिकृत उमेदवार असतील.

