ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे. तर, निवडणूक काळात भाजप अधिक मजबुतीने उभा राहताना दिसत आहे. अर्चना पाटील यांच्या प्रवेशाने भाजप लातूरमध्ये बळकट झाली आहे.
पेशाने डॉक्टर असलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे पाहायला मिळत होते. चव्हाण यांच्या प्रवेशानंतर लगेचच शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनीही भाजपात जाने पसंद केले. त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच बाबींच विचार करता माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने पक्षात घेतले आहे.
तत्पूर्वी , काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी पक्षाची साथ सोडली आहे. या बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान पाच वर्षांपूर्वीच डॉ. अर्चना चाकूरकर यांना भाजपमध्ये सामील होण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑफर दिली होती. मात्र काही कारणांनी त्यांनी ही ऑफर नाकारली होती. दरम्यान अर्चना पाटील यांचे सासरे आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे पुत्र आमदार बसवराज पाटील भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. अर्चना पाटील भाजपमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी अनेक बड्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
