आम्ही ऑपरेशन केलं, तर कळत नाही; कळलं तर ते ऑपरेशनच नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे ठाकरे गटाला रामराम करुन सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात ऊत आला आहे. परंतु भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंचं थेट नाव घेत पक्षप्रवेशाची शक्यता उडवून लावली. इतकंच नाही, तर “आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला (माध्यमांना )कळतच नाही, तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही” असा डायलॉगही मारला. शिवराज पाटील चाकूरकर यांची सून अर्चना पाटील यांनी भाजपप्रवेश केला, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

अंबादास दानवेंशी आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्यात कोणतीही चर्चा नाही, असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. निवडणुकीदरम्यान प्रवेश, भुकंप होत असतात. आज तरी असं कोणीच नाही. ज्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात उभे करत आहात त्यांच्यातील कोणीही नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अमित देशमुख माझ्या संपर्कात नाहीत. त्यांच्या भाजपा प्रवेशाची कोणतीही चर्चा नाही. विरोधक असले तरी उगाच त्यांना संशयाच्या फेऱ्यात उभं करु नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. भाजपात एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात. पण सगळे एकत्र काम करत असतात. मराठवाड्यात आम्ही रेकॉर्डब्रेक विजयाची नोंद करु असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी महायुतीतील जागा वाटपावरही भाष्य केलं. आमचं चार पाच जागांवर अडलेलं आहे. एक जागा अडली तर तीन जागा अडल्या जातात. फार अडलंय असं नाही. थोडं अडलं आहे. तो तिढा आज उद्या सुटेल, असं सांगतानाच धाराशीवच्या जागेबाबत महायुतीच्या स्थानिक नेत्यांनाच निर्णय घेण्यास सांगितलं आहे, ज्या जागांवर मतभेद आहेत, त्या जागांवर चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसात त्या जागांचा देखील तोडगा काढला जाईल, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीसांनी दिलेली जबाबदारी 100 टक्के पार पाडणार – अर्चना पाटील चाकूरकर

भाजपमध्ये पक्षप्रवेश करतांना अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की, “मी गेली 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते. माझा हा राजकीय प्रवासाचा निर्णय आहे. मी आज हा श्री गणेशा आजपासून करत आहे. मोदी साहेबांचा प्रवास आम्ही बारकाईन बघत होतो. संसदेतले पहिले महिला विधेयक पारीत झालं, तो एक ऐतिहासिक निर्णय होता. आरक्षणामुळे महिलांना संधी मिळेल. देवेंद्र भाऊ तुम्ही जी जबाबदारी द्याल ती 100 टक्के पार पाडीन, असे अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या.