राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज

राज्यात सध्या सूर्य तापल्याने उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीच्याही पुढे गेला आहे. रात्री देखील आता उकाडा जाणवत आहे. मात्र राज्यात हवामानात मोठे बदल होणार असून कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. विदर्भात आज उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर पुढील २४ तासांत राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी मुंबईत सांताक्रूझ येथे ३२.५ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. आर्द्रतेमुळे शुक्रवारीही किमान तापमानाचा पारा चढा होता. सांताक्रूझ येथे २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईत अधून मधून जाणवलेल्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्याचा ताप अधिक जाणवला. मात्र शुक्रवारचा मुंबईचा उष्णता निर्देशांक ४० अंशांहून कमी होता, असे भारतीय हवामान विभागाच्या नकाशावर नोंदले गेले. शनिवारीही आभाळ अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे, तसेच कमाल तापमानाचा पारा अधिक चढू शकतो असाही अंदाज आहे. त्यानंतर रविवारपासून आभाळ पुन्हा निरभ्र होईल.

शुक्रवारी रात्री विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस अमरावती विभागात झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे अमरावतीत नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. अवेळी होत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहे.

हवामान विभागाने आज अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती लातूर, धाराशिव, संभाजीनगर, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी ठिकाणी तापमान वाढेल, असाही अंदाज दिलाय.