शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर त्यांचं बंड मागे घेतलं आहे. अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्याने ते मागच्या आठवड्यापासून चर्चेत आले होते. अखेर महाविकास आघाडीतील तिन्ही नेत्यांनी हे बंड शमवलं आहे. शिवतारे यांनी बोलताना बंड मागे घेण्यामागे एक फोन कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट केलं आहे. शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, मी माघार घेणारच नव्हतो परंतु मला एक फोन आला आणि त्यांनी माझं मतपरिवर्तन केलं. तो फोन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
बारामती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र अजित पवार यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या विजय शिवतारे यांनी बंडखोरी करत बारामतीमधून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली होती. विजय शिवतारे यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.
माध्यमांशी बोलताना शिवतारे म्हणाले की, दादांच्या हातून काही चुका झाल्या असतील काय झाले असतील पण आज मोठं ध्येय साधण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्याचं काम करावं,असा ठराव आज आम्ही केला आणि सुरुवातीच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या पण जेव्हा हे सगळं ऐकलं त्याच्या नंतर सर्व लोकांनी एक मुखाने घोषणा दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काल बैठक झाली यावेळी बैठकीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे हे एकत्र आले होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात वाद पाहायला मिळत होता. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर अनेकदा टीका केली. राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कट्टर मित्र कधी शत्रू होतील आणि शत्रू कधी कट्टर मित्र होतील याचा नेम नाही. असंच काहीसं वर्षा बंगल्याच्या कालच्या बैठकीमध्ये घडलं आहे. या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.
पुरंदरमध्ये संपूर्ण शिवसेनेची सर्व आणि एकूण दीड लाख मते महायुतीचा उमेदवाराला म्हणजे घड्याळाला गेली पाहीजेत, असे स्पष्ट आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा सत्तारूढ करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू, असा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला.
