अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिट्टी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत एस. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर,अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

यावेळी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे 1,16,518 अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने 40% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व 85 वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना 12-डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्यभरातून दि. 28 मार्चपर्यंत 85 वयावरील जेष्ठनागरिक यामध्ये 17 हजार 850 मतदारांचे तसेच 40% दिव्यांगत्व असलेले 5 हजार 453 दिव्यांग मतदारांचे 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील 53 मतदारांचे 28 मार्च पर्यंत 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत 190अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या 241 एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे.