काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप, बडा नेता काँग्रेस सोडणार; सुनील तटकरे यांचं ट्विट

मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, राजू वाघमारे आणि संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आणखी एक बडा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहे. माजी आमदार मुश्ताक अंतुले हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून मुश्ताक यांची ओळख असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा काँग्रेसला धक्का मानला जातो. मुश्ताक अंतुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र समजले जातात. अनेक कार्यक्रमांनिमित्त या दोन्ही नेत्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे असते. आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यामुळे अलिबाग लोकसभा मतदार संघात निश्चितच तटकरे यांना फायदा होणार असल्याच्या चर्चा आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे राजकीय वारसदार आणि गेली 40 वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आज ( 22 एप्रिल ) रोजी सकाळी 11 वाजता एमसीए लाउन्ज, गरवारे क्लब, वानखडे स्टेडियम मुंबई येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे. दादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाट चालत आहे, असं सुनील तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यात शिवसेना फुटली. त्यानंतर राष्ट्रवादी फुटली. तोपर्यंत काँग्रेसच्या एकाही नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली नव्हती. राज्यात काँग्रेस मजबूत असल्याचं मानलं जात होतं. पण गेल्या दोन महिन्यात काँग्रेसला एकामागोमाग अनेक धक्के बसले. काँग्रेसचे बडे नेते आणि दोन पिढ्यांपासून काँग्रेससोबत असलेल्या नेत्यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला. संजय निरुपम आणि राजू वाघमारे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसची चांगलीच पडझड झाली आहे.