सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही, पक्ष नाही. खरी शिवसेना मी वाचवली. त्यामुळेच अनेक लोक माझ्यासोबत आले. मी काही एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.
यावेळी ते म्हणाले की, गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आलेत, असं काही लोक ठाण्यात फिरून सांगत आहेत. पण तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात. आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. शिवाय आता या लोकसभेत महायुतीचा खासदार होणार आहे. हे सगळे माझे उमेदवार नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणतात. पण काही काळानंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरुनही जातात. पण आम्ही सगळ्यांना उभं करतो आणि उभंही राहतो. त्यामुळेच गेल्या 10 वर्षांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रुपाने काम करणारा खासदार आपल्याला मिळाला आहे, हे विसरुन चालणार नाही.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या पूर्व विदर्भातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असे भाकित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविले. आता आपल्या ठाण्यातही महायुतीच्या उमेदवाराला जिंकून आणायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. 2019 मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि जनतेच्या विचाराचे सरकार झाले पाहिजे होते. पण तेव्हा हे काँग्रेससोबत गेले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ती चूक आम्ही दुरुस्त केली. त्यांच्या अहंकाराने राज्य खड्ड्यात घालण्याचे काम केले. आज याठिकाणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. या देशामध्ये 10 वर्षात मोदी सरकारने काम केले आहे. तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात आराम करणारा व्यक्ती हवा, हे तुम्ही ठरवा, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
‘प्राण जाए पर वचन ना जाए’ ही नरेंद्र मोदी यांची ओळख आहे, त्यांची राहुल गांधी परदेशात जाऊन बदनामी करतात. ही नकली शिवसेना, शेळ्यांचे कातडे पांघरलेले नकली वाघ, मोदींवर आरोप करतात. त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.
महिलांना शक्तिशाली बनवण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार घेत असताना महिला सुरक्षा अभियान राबवत आहोत, काही लोकं महिलांची टिंगल करतात, महिलांबाबत अपशब्द वापरतात, आम्ही गुवाहाटीला असताना आमच्यासोबत असलेल्या महिला आमदारांचा अपमान करणाऱ्यांना ही महिला शक्ती घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.
