माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट येत आहे. धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असतानाही भाजपनं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील देण्यात आली. माढ्यामध्ये आता धैर्यशील मोहिते पाटील विरोधात रणजीतसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे. मात्र दुसरीकडे या मतदारसंघात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.
मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यानंतर भाजपने कट्टर विरोधक असलेल्या आमदार बबनदादा शिंदे आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंतयांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. दोन्ही नेते एकत्र आल्याने भाजपला दिलासा मिळणार आहे. कारण दोन्ही नेते युतीधर्म पाळून भाजपसाठी काम करणार आहेत.
उत्तमराव जानकर यांनी धैर्यशील मोहीते पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र दुसरीकडे भाजपनं देखील आता मोठा डाव टाकला आहे. माढा लोकसभा मतदार संघात विजय खेचून आणण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी आता माढा तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आमदार बबन शिंदे आणि शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजी सावंत हे आता एकत्र येऊन भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.
माढा तालुक्यात गेली 35 वर्षे आमदार बबनदादा शिंदे यांची सत्ता आहे. त्यांना कट्टर विरोध करण्याचे काम आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत करत आले आहेत. दरम्यान, माढातील कट्टर विरोधक भारतीय जनता पक्षासाठी एकत्र आले आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातून शिंदे-सावंत युती महायुतीला 1 लाखाचे मताधिक्य देईल, असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार हे निश्चित झाल्यानंतर भाजपाला दुसरा धक्का बसला मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी भाजपबाबत थेट नाराजी व्यक्त केली आणि मोहिते पाटील यांना साथ दिल्याने भाजपच्या अडचणी वाढ झाल्याचे दिसत होते.पवारांच्या या खेळीनंतर माढ्यात भाजपने मोठा डाव टाकला आहे.
