ठाकरे गटाला मोठा धक्का,नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; विजय करंजकर यांचा शिवसेनेत प्रवेश

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. उद्या सात मे रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली असतानाच नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.

नाशिकमधले ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे आणि पहाटे अडीच तीनच्या सुमारास मुंबईतल्या बाळासाहेब भवन या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसेही उपस्थित होते. विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

नाशिकमध्ये लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटण्यासाठी विलंब झाल्यानं उमेदवाराची घोषणा देखील उशिरा झाली. या जागेवर शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीनं देखील दावा केला होता. मात्र अखेर नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विजय करंजकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नाशिकमध्ये महायुतीची ताकत आणखी वाढली आहे, मात्र दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विजय करंजकर यांनी बंडाची तयारी केली होती. करंजकर यांच्या बंडाचा फटका ठाकरे गटासोबतच शिवसेनेलाही बसण्याची शक्यता होती. त्यामुळे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी करंजकर यांना शिवसेनेत आणत पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशानंतर बोरस्ते यांचे जिल्हाप्रमुखपद करंजकर यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे.