राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांच्या सभांचाही सपाटा सुरू असल्याचं पाहायला मिळतं.
सभांच्या निमित्ताने नेता आपल्या परिसरात आल्यानंतर त्यांचे चाहते विविध कृतींद्वारे नेत्याप्रती आपले प्रेम व्यक्त करतात. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनाही पंढरपूरमधील सभेवेळी असाच एक चाहता भेटल्या. फडणवीसांच्या या चाहत्याने त्यांना चक्क आपल्या रक्ताने रेखाटलेले चित्र भेट म्हणून दिले. या प्रेमाने भारावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला या तरुणाचे आभार मानले आणि नंतर त्याला असे चित्र रेखाटण्याऐवजी रक्तदान करावे, असा प्रेमळ सल्लाही दिला.आपल्या (ट्विटर) एक्सवर त्यांनी फोटो शेयर केला. माझ चित्र रेखाटण्याऐवजी रक्तदान करा, असा सल्ला फडणवीसांनी दिला. पियुष शैलजा गिरीश हत्तीगोटे असं या कलाकाराचं नाव आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पंढरपूरचा पियुष शैलजा गिरीश हत्तीगोटे याने स्वत:च्या रक्ताने रेखाटलेले चित्र मला आज पंढरपूरच्या दौऱ्यादरम्यान भेट दिलं आहे. मी त्याचा मन:पूर्वक आभारी आहे. पियुष तू भेट दिलेले चित्र अतिशय उत्तम, यात वाद नाहीच. कला म्हणून मी त्याचा सन्मानच करतो. पण, माझी यानिमित्ताने एक विनंती सर्वांना आहे, तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा, मोठ्या प्रमाणात रक्तदान करा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अनेकांची आयुष्य वाचवण्याच्या कामी हातभार लागेल. आपले रक्त समाजासाठी अर्पित करणे, हीच आपली संस्कृती आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला वाटचाल करायची असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच माझ्यावर दाखविलेल्या या प्रेमाबद्दल फडणवीस यांनी पियुषचे आभार मानले.
