‘हिंदुत्ववादी नेत्यांची नावं घेण्यासाठी दबाव’ मालेगाव प्रकरणात कर्नल पुरोहितांचा खळबळजनक दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील नवीन खुलासा झाला आहे. या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने त्यांचे वकील विरल बाबर यांच्यामार्फत विशेष एनआयए न्यायालयात लेखी जबाब सादर केला आहे. त्यात अनेक गंभीर आरोप मुंबई एटीएसच्या अधिकाऱ्यांवर केले आहेत. एसटीने आपल्याला प्रचंड टार्चर केल्याचा दावा केला आहे. एसटीएसच्या अत्याचारामुळे माझा उजवा गुडघा मोडल्याचा दावा पुरोहित याने केला आहे. एटीएस अधिकारी त्याची बेकायदेशीरपणे चौकशी करत होते आणि कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी हिंदुत्ववादी नेत्यांकडून दबाव होता. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करायला लावल्याचंही पुरोहित यांनी म्हटलं आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात पुरोहित यांचा 23 पानी लेखी जबाब सादर करण्य़ात आला. एटीएसनं राजकीय दबावापोटी खोटी केस दाखल केल्याचा पुरोहितांनी आरोप केला. याशिवाय दाऊद इब्राहिम आणि कम्युनिस्टवादी नेता डॉ. गणपती या दोघांची भेट झाली होती. या भेटीतून महाराष्ट्रातील नक्षली कारवायांची माहिती आपण भारतीय लष्कराला दिली होती असा दावा पुरोहितांनी केला.

प्रसाद पुरोहितने कलम ३१३ च्या अंतर्गत निवेदन सादर केलं आहे. विशेष न्यायालयात आपले म्हणणे मांडण्यासाठी लेखी निवेदन सादर करण्याचा अधिकार आरोपीला आहे. पुरोहितने म्हटलं आहे की हेमंत करकरे, सिंग आणि तपास अधिकारी मोहन कुलकर्णी यांच्या आदेशाचं पालन इतर सर्व पोलिसांनी केलं. हेमंत करकरे हे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्यांचंही नाव यामध्ये पुरोहितने घेतलं आहे.

नेपाळमधून शस्त्र, ड्रग्ज यांचा पुरवठा बंद झाल्यानंतर दंडाकारण्यातून नक्षलवाद्यांना पुरवठा झाल्याची माहिती आपण देत होतो असा दावा कर्नल पुरोहितांनी केला. महाराष्ट्रातील ठाणे, पालघर आणि मध्य प्रदेश सीमेपर्यंत पुरवठा होत असल्याची माहिती दिली होती. तसंच 2006-07 मध्ये डॉ. झकीर नाईकने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून बनावट नोटा वितरित करण्यात येत होत्या आणि आयएसआयकडून दहशतवादी कृत्यांना पाठबळ दिलं जात असल्याचा अहवाल दिला होता, असंही पुरोहित यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.