हैदराबाद हा एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपाने प्रचारात पूर्ण ताकद झोकली आहे. भाजपाने हैदराबादमधून असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात माधवी लता यांना तिकीट दिलं आहे. हिंदुत्ववादी नेत्या म्हणून माधवी लता यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या माधवी लता यांच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये गेल्या होत्या. तेलंगणसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपाने नवनीत राणा यांचा समावेश केला आहे. याच नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे प्रचारा दरम्यान वाद निर्माण होईल असं वक्तव्य केलं आहे. भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी नाव न घेता ओवैसी बंधुंवर प्रहार केला.
हैदराबादमध्येभाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेलेल्या नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंना आव्हान देताना १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे ठरतील, असं विधान केलं होतं. या विधानावरून आता मोठ्या वादाला तोंड फुटलं असून, एमआयएमने राणांच्या विधानावरून थेट भाजपााला लक्ष्य केलं आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. अशा विधानांमुळे निवडणुकीदरम्यान, दोन समुदायांमधील तणाव वाढू शकतो, असा दावा वारिस पठाण यांनी केला आहे.
याआधी सन २०१२ मध्ये अकबरुद्दीन ओवैसीनं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता, की पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा मग आम्ही दाखवून देऊ की कुणात किती दम आहे. त्याच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली होती. या प्रकरणात कोर्टाने त्याची सुटका केली होती. परंतु, ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा या वक्तव्याचा दाखला देत ओवैसी बंधूंवर टीका होत असते.
राणा पुढे म्हणाल्या, हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी ही निडणूक आहे. यावेळी तसंच मतदान करायचं आहे. आमची वाघीण माधवी लता यांना संसदेत पाठविण्यासाठी मतदान करायचं आहे. हैदराबादमधील सर्व हिंदूंना जागं करण्यासाठी मतदान करायचं आहे, असे नवनीत राणा या प्रचार सभेत म्हणाल्या. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
