नाशिकमध्ये ऐन निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखांना तडीपारची नोटीस देण्यात आली आहे.नाशिक निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस आल्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावानं पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र, सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशकातून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आलं होतं. ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यानं नाशिकचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत.
परिमंडल दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस आली आहे.काही दिवसांपूर्वी भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप केला होता. समोर आलेला व्हिडीओ खोटा आहे. त्यात मोर्फिंग करून त्यांना दाखवण्यात आल्याचं सुधाकर बडगुजर म्हणाले होते.
