ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांना माकड म्हणून संबोधलं होतं. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना आता डॉक्टरांची गरज आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे आज संभाजीनगर येथे बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचडव येथील सभेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय आहे. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. त्यांनी एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञांना दाखवावं. त्यांनी मदत घ्यावी, मला असं वाटतं,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ज्या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो. तेव्हा त्यांना हे लक्षात येतं की जनतेने त्यांना नाकारलं आहे आणि म्हणून ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळं त्यांनी वैदयकीय मदत घ्यावी.अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात हे माहिती नाही. पण मी उद्धवजींना चांगलाच ओळखून आहे. सध्या त्यांचे फिलोसॉफर आणि गाइड पवार साहेब आहेत. पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी लोकसभेनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना शिंदे आणि फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष विलीन होणार असल्याचं भाकीत बोलून दाखवलं होतं.
