अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे. दाभोळकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. मात्र प्रत्यक्ष खटला 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू झाला होता. याप्रकरणी आपला राखून ठेवलेला निकाल आज (शुक्रवार 10 मे) रोजी देण्यात येणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी दाभोलकर यांच्या छातीत, तर दुसरी गोळी त्यांच्या डोक्यात लागली होती.या घटनेत दाभोलकर यांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला या घटनेचा तपास पुणे पोलिसांनी केला होता. मात्र, त्यानंतर हे प्रकरण एटीएस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलं.
मात्र 2018 मध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा-या कर्नाटक एटीएसनं पुण्यात येऊन अमोल काळेला अटक केली. त्यानंतर याप्रकरणातील धागेदोरे पकडत तपासयंत्रणेला दाभोलकर प्रकरणात यश मिळालं. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली. विक्रम भावेनं डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ॲड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांनी आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता जे अद्याप सापडलेलं नाही, असं आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतवून घेतले. 1982 सालापासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांचा पूर्ण सहभाग होता. 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ही संस्था कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा परकीय मदत न घेता काम करते.
