अजित पवारांना घशाचं इन्फेक्शन; राष्ट्रवादीकडून अधिकृत माहिती जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच मुंबईत रोड-शो झाला. या रोड-शोमध्ये भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी रोड शोमध्ये हजेरी लावली. मोदींचा रोड शो अतिशय भव्यदिव्य असा होता. या रोड शोमध्ये मुंबईकरांनीदेखील प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. इतक्या भव्यदिव्य रोड शोला महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार नाराज आहेत का? अशी चर्चा रंगू लागली होती. अखेर अजित पवार मोदींच्या रोड-शोमध्ये का उपस्थित नव्हते? याबाबतची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांना घशाचं इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. घशाचं इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितलं आहे. अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. अजित पवार पावसात भिजल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात इन्फेक्शन झालंय. त्यामुळे ते मोदींच्या मुंबईतील रोड शोमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. पण अजित पवार उद्यापासून प्रचारात सहभागी होतील, असं उमेश पाटील यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे बारामतीची निवडणूक झाल्यापासून अजित पवार हे गायब असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काय म्हणाले उमेश पाटील?
“अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे. मात्र ते उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होतील”, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली.

अजित पवार यांना जाणीवपूर्वक प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपालाही उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. “काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहे. यात काहीही तथ्य नाही. अजित पवार यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्ह्यात आहेत. मतदारांचा मोठा वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करुन घेईल का?” असे उमेश पाटील म्हणाले.