मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या व अखेरच्या टप्प्यासाठी सोमवार, 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम म्हणाले की, येत्या सोमवारी राज्यात पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून मतदारांना मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, मतदारांसाठी शेड, मेडीकल किट, मतदार सहाय्यता केंद्राची व्यवस्था करावी. मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शिका पुस्तिका तसेच अंध दिव्यांगासाठी ब्रेललिपी वोटर स्लिप मतदारांपर्यंत वेळेत पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उन्हाची तीव्रता तसेच पावसाचे सावट या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या इपीक कार्डाचे वितरण झाल्याची खात्री करावी. एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्र असेल तेथे गर्दी टाळण्यासाठी मतदारांना बसण्यासाठी वेटींग रुमची व्यवस्था करावी. सूक्ष्म निरीक्षकांना विविध अहवाल देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावेत. दर दोन तासांनी मतदानाची अचूक आकडेवारी देण्यात यावी.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, मतदानाच्या काळात सोशल मीडीयावर प्रसारीत होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करावेत. कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी. चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांची तपासणी काटेकोरपणे करावी, ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.

ईव्हीएम मशीन हाताळतांना काळजी घ्यावी. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांना मोबाईल फोन वापरण्यास प्रतिबंध असल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मतदानाच्या दिवशीचे सर्व अहवाल विहित नमुन्यात आणि विहित वेळेत पाठवावे. मतदानासाठी मतदारांवर कुठलाही दबाव येणार नाही तसेच त्यांना कोणतेही अमिष दाखविले जाणार नाही याची दक्षता घेऊन निवडणूक निर्भय व निरपेक्ष पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.