पंतप्रधान नरेंद्र मोदी – राज ठाकरे एकच मंचावर; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा

दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडणार आहे. या सभेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावेळी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज शिवाजीपार्कवर एकत्रित सभा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने या सभेवर टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोदींच्या सभेवर टीका केली आहे. मनसेच्या वतीने मविआच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना सभेचे निमंत्रणच दिले आहे. इतकेच नाही तर तुमच्यासाठी स्टेजसमोरील पहिल्या रांगेत 3 जागा आरक्षित ठेवत असल्याचेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा पार पडणार आहे. दरम्यान, उद्याच्या शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये अजित पवार उपस्थित नव्हते, पण शुक्रवारी होणाऱ्या सभेला मात्र अजित पवार हजेरी लावणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

महायुतीबरोबर महाआघाडीतील बड्या नेत्यांची आज शुक्रवारी सभा होत आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नेते अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. ही सभा संध्याकाळी सहा वाजता बीकेसी मैदानावर होणार आहे. या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाही.

शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान गेली दोन वर्षे मिळाले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणते गौप्यस्फोट करणार आहेत, यावरही राजकीय चर्चा सुरु झालेली आहे. ही निवडणुक महायुतीसाठी प्रतिष्ठेची असल्याने लोकसभेच्या मुंबईतील सहाही मतदारसंघातील मतदारांवर या सभेचा प्रभाव पडणार असल्याने सभेसाठी महायुतीकडून जय्यत तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त शिवाजी पार्क परिसरात असून गर्दीचा उच्चांक या सभेला होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.