शिवसेना ठाकरे पक्ष ठराविक टोळक्याच्या ताब्यात, संजना घाडी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना सुनावले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पक्षात उभी फूट पडली, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला तरी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यपद्धती बदलली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना ठाकरे पक्ष ठराविक टोळक्याच्या ताब्यात आहे, त्याच्याच मनाने निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या फायरब्रँड महिला नेत्या संजना घाडी यांनी उध्दव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. ( Shiv Sena Thackerays party is under the control of a certain group Sanjana Ghadi heard Thackeray chanting Jai Maharashtra)

शिवसेना (ठाकरे गट) मध्ये निर्णय काही ठराविक टोळक्यांच्या मनाने घेतले जात होते. आम्ही निरीक्षक म्हणून प्रामाणिकपणे काम केले, मात्र तिकीट वाटपात आमच्या कामाची दखल घेतली गेली नाही, असे घाडी यांनी म्हटले आहे.

संजना घाडी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पतींसह त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश करून ठाकरे गटाला दणका दिला आहे.

दहिसर भागातून घाडी दाम्पत्य शिवसेनेचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या पक्षाच्या प्रवक्त्यांच्या यादीतही घाडी यांचे नाव होते. मात्र, पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि निर्णयप्रक्रियेतील विसंगती यामुळे त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षप्रवेशानंतर बोलताना संजना घाडी म्हणाल्या, पक्षात काही लोक संघटना संपविण्याचे काम करत आहेत. आम्ही सगळ्यांशी संपर्क केला, पण कुणीही वेळ दिला नाही. शेवटी आम्हाला भेट देणं देखील टाळलं गेलं. त्यामुळे हा निर्णय आमच्या वैयक्तिक, संघटनात्मक आणि राज्याच्या हितासाठी योग्य वाटला.

ठाकरे गटासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना मोठा राजकीय झटका मानली जात आहे. संजना घाडी यांच्यासारख्या कार्यकर्त्या पक्ष सोडत असल्याने पक्षातील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे.

संजना घाडी या शिवसेनेच्या (ठाकरे गटाच्या) उपनेत्या होत्या. मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेवक होत्या
शिवसेना पक्षात गेली अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. महिला सेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने पक्ष प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती, यातही घाडी यांचे नाव होते