हिंदू धर्माच्या प्रतीकांवर अश्लील टिप्पणीप्रकरणी मंत्री पोनमुडी अडचणीत; मद्रास उच्च न्यायालयाचा एफआयआर दाखल करण्याचा स्पष्ट आदेश

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तमिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांच्यावर हिंदू धर्मातील शैव आणि वैष्णव संप्रदायाच्या प्रतीकांवर अश्लील आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. (The Madras High Court has ordered a case to be registered against Tamil Nadus Higher Education Minister K Ponmudi for making obscene and derogatory comments on the symbols of the Shaivism and Vaishnavism sects of Hinduism.)

या प्रकरणात बी. जगन्नाथ या वकील आणि वैष्णव अनुयायाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती एन. आनंद वेंकटेश यांनी २३ एप्रिलपूर्वी पोलिसांनी पोनमुडी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावा, अन्यथा न्यायालय स्वतःहून (suo motu) गुन्हा दाखल करेल, असा इशारा दिला आहे.

काय आहे वादग्रस्त विधान?
पोनमुडी यांनी एका कार्यक्रमात कथित विनोद सांगताना शैवांचे आडवे ‘पट्टई’ तिलक आणि वैष्णवांचे उभे ‘नामम्’ तिलक यांची तुलना वेश्येने विचारलेल्या लैंगिक मुद्रांशी केली. त्यांनी सांगितलेल्या विनोदात एक वेश्या ग्राहकाला विचारते की तो शैव आहे की वैष्णव? आणि मग तिला सांगायचं असतं की, जर तो शैव असेल तर ‘झोपून’, आणि वैष्णव असेल तर ‘उभं राहून’ असा संबंध असेल.

न्यायालयाचा संताप
न्यायमूर्ती वेंकटेश यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “जेव्हा इतर व्यक्तींनी केलेल्या द्वेषयुक्त भाषणांवर सरकार कडक कारवाई करते, तेव्हा स्वतःच्या मंत्र्याने असं विधान केलं तरी तितकीच कडक कारवाई अपेक्षित आहे.”

न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की एकाच प्रकरणावर अनेक एफआयआर नोंदवण्याची गरज नाही. “एकच एफआयआर नोंदवा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडा. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे,” असा ठाम आदेश न्यायालयाने दिला.

पक्षाची प्रतिक्रिया आणि मंत्रीपद अबाधित
या वादानंतर डीएमके पक्षाने पोनमुडी यांना उपमहासचिवपदावरून हटवले आहे. मात्र, ते अद्यापही तमिळनाडू सरकारमध्ये मंत्रीपदावर कायम आहेत. पोनमुडी यांनी आपले विधान चुकीचे असल्याचे मान्य करत जाहीर माफी मागितली असली, तरी या प्रकरणावरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा वाद धार्मिक भावना दुखावणारा असल्यामुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.