विशेष प्रतिनिधी
मालदा (पश्चिम बंगाल): वक्फ सुधारणा कायद्याविरोधातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि जंगीपूर जिल्ह्यांमध्ये उफाळलेल्या दंगलींमध्ये हिंदू समाजावर झालेले अमानुष अत्याचार आता समोर येत आहेत. या दंगलींमध्ये घरदार गमावलेल्या, अपमानित झालेल्या आणि शारीरिक अत्याचार झेललेल्या महिलांची भेट घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मालदा जिल्ह्यातील शरणार्थी शिबिराला भेट दिली. ( Murshidabad riot victims share harrowing stories National Commission for Women Chairperson Vijaya Rahatkar visits Malda camp)
या भेटीदरम्यान पीडित महिलांनी अक्षरशः विजया रहाटकर यांच्या गळ्यात पडून आपल्या व्यथा सांगितल्या. अनेक महिलांनी अश्रूंच्या धारा लावल्या आणि जे काही त्यांच्या आयुष्यात घडलं, त्याची कहाणी अंगावर शहारे आणणारी होती. काहींनी सांगितले की, धर्मांध मुस्लिम गुंडांनी त्यांच्या घरांवर अचानक हल्ला चढवला, मालमत्ता लुटली, घरे पेटवून दिली आणि महिलांवर अत्याचार केले.
या दंगलींमध्ये तरुण मुलींपासून ते वृद्ध स्त्रिया आणि लहान मुलांपर्यंत कोणालाही दया दाखवण्यात आली नाही. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले आणि कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवण्यात आले. परिणामी, तब्बल ८०० हून अधिक हिंदू कुटुंबांनी मालदामधील शाळांमध्ये आश्रय घ्यावा लागला.
मुर्शिदाबाद व जंगीपूरमध्ये हिंदू समाजाच्या अनेक मालमत्ता लुटण्यात आल्या. हिंदू महिलांना घरातून खेचून बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्यावर हात टाकण्यात आला. या घटनांनी देशाच्या फाळणीच्या काळाची आठवण करून दिली, असे अनेक महिलांनी सांगितले.
विजया रहाटकर यांची भावनिक भेट
विजयाताईंनी प्रत्येक महिलेशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांनी महिलांच्या मनावरील जखमांवर मायेची फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. “राष्ट्रीय महिला आयोग तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महिलांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवरही नाराजी व्यक्त केली. “आम्हाला आज आमच्या देशातच निर्वासित व्हावं लागतंय,” असा आक्रोश पीडित महिलांनी केला.
