राम मंदिराचे भव्य स्वप्न साकारतेय; ५ जूनपर्यंत पूर्ण होणार बांधकाम , श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

अयोध्या :कोट्यावधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम अखेर अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. येत्या ५ जून २०२५ रोजी मंदिराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली.

( The grand dream of Ram temple is being realized Construction will be completed by June 5 informed Nripendra Mishra Chairman of Shri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra Samiti)

मिश्र यांनी सांगितले की, “रामलल्ला विराजमान असलेले गाभाऱ्याचे बांधकाम पूर्वीच पूर्ण झाले आहे. पहिला आणि दुसरा मजला तसेच शिखराचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. आज मंदिराच्या शिखरावर ध्वजदंड स्थापित करण्यात आला असून, यामुळे शिखराचे बांधकाम अधिकृतरित्या पूर्ण झाले आहे. २३ मे रोजी प्रभू श्रीराम, माता सीता आणि हनुमानजींच्या मूर्ती अयोध्येत आणण्यात येणार असून त्याच दिवशी या मूर्ती पहिल्या मजल्यावरील राम दरबारात विधिपूर्वक प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत. त्यानंतर काही दिवस विविध धार्मिक विधी होणार आहेत.

५ जून रोजी विशेष पूजाविधीच्या माध्यमातून श्रीरामाची विधिवत प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर संपूर्ण मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. मिश्र म्हणाले, “हा ऐतिहासिक दिवस केवळ अयोध्येपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे प्रतीक ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष सूचनेनुसार रामायणातील महत्त्वाच्या सप्त ऋषी आणि भक्तांसाठी सात स्वतंत्र मंदिरे बांधण्यात आली आहेत. महर्षी वाल्मिकी, वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र, अहिल्या माता, निषादराज महाराज, शबरी माता आणि अगस्त्य मुनी यांची ही मंदिरे आहेत. या मंदिरे मंदिराच्या मुख्य परिसरात असून, ५ जूननंतर तीही सर्वसामान्य भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहेत.

श्रीराम मंदिराच्या पारकोटाभोवती बांधलेल्या सहा प्रमुख मंदिरांमध्येही त्याच दिवशी विधीपूर्वक पूजा संपन्न होईल. ट्रस्टचे महासचिव चंपत राय लवकरच ५ जूनच्या कार्यक्रमांचा तपशीलवार आराखडा जाहीर करतील, अशी माहिती मिश्र यांनी दिली.

मंदिर पूर्ण होण्याआधीच दररोज ७५ हजार ते १ लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत. भक्तांचा हा अपार विश्वास आणि श्रद्धा आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे, असेही ते म्हणाले.

५ जूननंतर केवळ मुख्य मंदिरच नव्हे, तर मंदिर परिसरातील सर्व नवीन मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले होतील. एक-दोन दिवसांत संपूर्ण व्यवस्था सुरळीत करून भाविकांना अखंड दर्शनाचा अनुभव मिळेल, असे मिश्र यांनी सांगितले.